Friday, 3 April 2015

मग्न मी तुझ्यात पूर्ण
स्वप्न का तरी अपूर्ण
एकदातरी उगीच
ये अशीच ये सजून

सोड जुने वाद अता
विसर जुन्या त्या शपथा
काय लाभणार जुन्या
आठवणी आठवून

त्यापरी असे करु
सहज नवा रंग भरु
उरलेल्या लाख चुका
त्याही घडवू चुकून

किंवा मग त्याही पुढे
स्वैर होऊ अतरंगी
आणि मृत्युच्या दारी
सांगू जगा घे समजुन.

- Rugved Sukant Deshpande 
आकाशाच्या उरी। प्रकाशाचा गर्भ।
पाखरांचा जन्म। वार्यावरी।।

उषेच्या हवाली। सांजेची चाहूल।
मौनाचे माहेर । रात्रीपाशी।।

केतकीचा दारी। सांडलेला सडा।
डोइवर घडा। पाचोळ्याचा।।

भांबावले मन। शून्यात नजर।
कुणा ना कदर। आयुष्याची।।

-Rugved Sukant Deshpande 
आठवणीतली संध्याकाळ ...

संध्याकाळ अजूनही पूर्वीसारखीच
पण मनातली हुरहूर मात्र काहीशी वेगळी...
आता संध्याकाळी मित्रांची बैठक जमत नाही,
मैफल सजत नाही
सारे कसे buzy झालेत आपापल्या व्यापात,
भ्रमाच्या  जाळ्यात...
मन मारून सारेच जगतायत - जमेल तसं.
पूर्वी मात्र असं न्हवत...
एक  miss call वरूनही समोरच्याच्या मनातलं सारं कळत होतं,
मनातलं दुःख मांडण्याआधीच   हलक होत होतं.
रात्र अंधारलेली न्हवतीच कधी
आठवण यावी इतकं अंतरही न्हवत भेटीत.
प्रत्येक गोष्ट shear व्हायची,
मस्करी व्हायची, प्रेमाच्या शिव्याही असायच्या...
वाढदिवस साजरे व्हायचे,
मोठं होण्यात गम्मत वाटायची...
आता मात्र वाढदिवशी एक वर्ष कमी झाल्याची जाणीव होते...
bank ballance ही काय shear करण्याची गोष्टय? असंही वाटू लागतं
आता bike चा speed सुद्धा पन्नासच्या वर जात नाही
उगाच तल्लफ आली म्हणून कटिंग कुणी मारत नाही...
कधीतरी अचानक रस्त्यात भेट होते
तेव्हाही इक्मेकांचे contact noumber  exchange  होतात,
पण त्यावर साधा sms सुद्धा कुणी कुणाला पाठवत नाही.
अगदी वाटलंच कधी भेटावसं  तरी वेळ जुळून येत नाही;
कुणी जुळवूनच घेत नाही.
आता एकटेपण देखील सहन होऊ लागलंय..
पूर्वीच्या  शपथा  आठवल्या की हसू येतं
ये दोस्ती हम नही तोडेंगे ...वगैरे
वेडेपणा वाटतो सगळा.
भ्रम होता का तो? की झिंग होती त्या वयातली ?
की आता गंज चढलाय मैत्रीच्या संकल्पनेलाच?
कुणास ठाऊक !
जुने दिवस परत येतील न येतील,
आठवणी मात्र आजही येतायत...
येत राहतील..
प्रत्येक संध्याकाळी...

- Rugved Sukant Deshpande.

सहनही होत नाही , नाही सांगणे जमत
तुझ्यावरल्या प्रेमाचे , नाही कारण कळत

जीव गुंतला कशाला , नाही सुटत सवय
जीव झुरतो उगाच , तुझे असणे अभय

तुझे चार शब्द गोड , माझा निबंध तुरट
तुझी ओढ वेडी पिशी , हौस नाहीच फिटत

मला ठाऊक तुझे ही , मन थोर की अल्लड
जन्म जन्माचे रे नाते , बंध नाहीच तुटत

'शोन्या' म्हणताना अशी , येते स्फूर्तीची लहर
जीव धन्य धन्य होतो , येतो प्रेमाचा बहर.
नको समजू कहर !

                                              -ऋग्वेद

तुझ्या मागे तुझ्यासाठी असा मी स्तब्ध अजुनी ..
जरा आभाळ गहिरे अन किनारे मग्न अजुनी ..

तुझी ही झेप तूफानी मला झेपायची केव्हा ?
तुझ्या स्वप्नात माझे जिंकण्याचे स्वप्न अजुनी ..

तुझ्या हाके ही आधी हजर मी होईन जागी
तुला आधार देण्यातून होईन व्यक्त अजुनी

तुला वाटेल का मी रोज होतो हा असा हळवा ?
तुझ्यावाचून माझे  बिघडते रे लक्ष अजुनी ...

नशिबाने मला तू लाभलेला श्वास माझा
तुझे मानू कसे आभार याहून स्पष्ट अजुनी ?

- ऋग्वेद       

Monday, 1 September 2014

ganarayache avahan..

आलास? … ये ये.…
आधी जरा शांत बस.. मोकळा श्वास घे…
आल्या आल्या केळी आणि मोदकांची लाच देऊन
तुझ्या मागण्यांच ओझं माझ्या पुढे ठेऊ नकोस.
किंवा या वर्षी काही मागुच नकोस.
मागच्या वर्षीच्या तुझ्या मागण्याचं काय झालं हे ही विचारू नकोस.
कारण तुझ्या कितीही मागण्या पूर्ण केल्या तरी तुझ्या अपेक्षा वाढतच जातात.
आणि आता यापेक्षा मोठं पोट नाही झेपायचं  मला.
त्यापेक्षा असं कर, या वर्षी माझ्या काही मागण्या पूर्ण कर
बघ जमतंय का..
माझ्या समोर दुसऱ्याचं वाईट चिंतू नकोस
उगीच माझ्या नावाखाली खोटी वर्गणी उचलू नकोस.
रात्रभर जागू  नकोस
जागलास तरी पिऊ नकोस
प्यायलास तरी निदान झिंगू नकोस
नकोय रे मला चिकमोत्याची माळ . . .
जमलच तर स्पीकरचा आवाज कमी कर जरा .
अश्लील शब्दातली तुमच्या गाण्यांची lyrics ऐकवत नाहीत मला.…
आणि बघवतही नाही तुमच्या  कॉम्प्लेक्सच्या कार्यक्रमातला नंगा नाच.
अशक्य होतो रे मला हे दहा दिवस तुमचा तमाशारूपी उत्सव सहन करण …
हात जोडून मागणं मागतो तुझ्याकडे -
जागा हो...
सुसंस्कृत हो.…
खोटेपणा सोड, स्वार्थ सोड...
कधीतरी प्रामाणिक होऊन बघ
माणुसकीची नशा चढव
परोपकाराची झिंग चढव
शंभर टक्के मेहेनत कर
स्वतःला ईश्वरी अंश मानणाऱ्या लोकांपासून सावध रहा
त्यांच्या आधारानी जगण्याचा प्रयत्न करून स्वतःचा आत्मविश्वास हरवून बसण्यापेक्षा तुझ्यातल्या देवत्वाला मनापासून जप.
दहशतीने जग जिंकण्यापेक्षा प्रेमाने मनं जिंक.
श्रीमंतांचे जोडे पुसण्यापेक्षा गरिबांचे पाय धू
पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत हो
रागवू नकोस भक्ता
आणि रिकाम्या हातानी जाऊ नकोस...
सतत काहीतरी मागत राहण्यापेक्षा अखंड देत राहण्यातला आनंद तुला लवकर लाभो हा माझा आशीर्वाद घेऊन जा.
भेटूच पुन्हा...
तथास्तु।


- ऋग्वेद.